अमर राजूरकर आणि त्यांच्या मालकांनी मुख्यमंत्री असल्यासारखे वागू नये. हिंमत असेल तर नांदेड जिल्हा दारूमुक्त आणि अवैध धंदे मुक्त करून दाखवाच असे खुले आव्हान प्रवीण साले यांनी फेसबुक पोस्ट करत दिलेल आहे.
नांदेड : राज्यात किराणा दुकान , सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेली टीका आणि शेतकऱ्यांना गांजा उत्पादनासाठी परवानगी देण्याची केलेली मागणी यावरून काँग्रेस नेत्याला चांगलीच झोमल्याचे दिसून येते. मुख्यमंत्रीपदावरून हाकलून दिलेल्या मालकाच्या मर्जी खातीर अमर राजूरकर यांच्याकडून करण्यात आलेली टीका म्हणजे निराशेपोटी केलेला उरबडवेपणा आहे, अशी टीका करत भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी हिंमत असेल तर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा दारूमुक्त करावा आणि अवैध धंदे मुक्त करावा मग त्यानंतर कळेल की हे अवैध धंदे कोणाचे होते आणि कोण चालवित होते, असे खुले आव्हान प्रवीण साले यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून राज्य सरकारवर सडकून टीका झाली. एवढेच नाही तर महाविकास आघाडीतील काही पक्षातील नेत्यांनी या निर्णयाला छुपा विरोध सुरू केला. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या वाढत आहेत, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. असे असताना बेरोजगारी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारकडून आता महाराष्ट्राला व्यसनाधीन करण्याचा डाव आखला गेला आहे. महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र घडविण्याचा कट रचलेल्या महाराष्ट्र सरकारवर खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जोरदार हल्ला चढविला होता. जर शेतकऱ्यांचा सरकारला पुळका असेल तर शेतकऱ्यांना गांजा उत्पादनाची परवानगी द्यावी शिवाय गांजा उत्पादनावर कर आकारण्याचा विचार करावा असा सल्लाही दिला होता. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची टीका राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना अनुसरून होती मात्र आपणच महाराष्ट्राचे कर्तेधर्ते आहोत अशी बैलगाडी खालील श्वानांची भूमिका बजावणाऱ्या अमर राजूरकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी चंद्रपूरमध्ये बंद पडलेले दारूची दुकाने आणली. मग दारू दुकाने चालविणाऱ्यानी शहाणपण शिकवू नये, असा बालिश सल्ला दिला. वास्तविक चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदी करून दाखवली. सुधीर मुनगंटीवार यांचा हा निर्णय पालकमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या चेल्यानी नांदेड जिल्ह्यात लागू करून दाखवा. नांदेड जिल्ह्यातील दारू विक्री आणि अवैध धंदे बंद करावे त्यानंतरच कळेल की,अवैध धंदे आणि दारू दुकाने कोणाची आहेत. असे आव्हान देताना अमर राजूरकर यांनी आता दलाली करणे सोडून देऊन लोकहिताची कामे करावीत, असा सडकून प्रहारही भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण साले यांनी केला आहे. अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद का गेले हे जगाला माहित आहे. त्यामुळे राजकीय नीतिमत्ता धुळीस मिळविताना नांदेडच्या पवित्र भूमीची इभ्रत आणि प्रतिष्ठा त्यांनी मातीत मिसळावी असेच काम केले आहे. आपले पाप लपऊन ठेवण्यासाठी चव्हाण यांनी आपल्या चेल्यांमार्फत इतरांवर आरोप करणे सुरू केले आहे. जर अशोक चव्हाण घोटाळेबाज नव्हते तर मुख्यमंत्री पद का सोडावे लागले हे अमर राजूरकर यांनी जनतेला पुराव्यानिशी सांगावे. मुख्यमंत्री पद गेले तरी दानात मिळालेल्या मंत्री पदाचा आपणच मुख्यमंत्री आहोत असा आविर्भाव चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दाखविला जात आहे. असेही साले म्हणाले.
नांदेड शहर आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था प्रचंड बोकाळली आहे. बिघडलेली कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांना प्रचंड अपयश आले आहे. नांदेड शहरात मटका, जुगार आणि अवैध धंदे चालविली जातात. त्यांचा खरा कर्ता-करविता कोण आहे हे नांदेडकरना चांगलेच ठाऊक आहे. सत्ताधारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील अनेक पदाधिकारी हे धंदे चालतात हे नवे राहिले नाही. असे असताना’ आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’ ही अमर राजूरकर यांची नीती जनतेला चांगलीच ठाऊक झाली आहे.
त्यामुळे अमर राजूरकर यांनी केवळ मालकाची मर्जी राखण्यासाठी इतरांवर बिनबुडाचे आरोप करण्याआधी आपल्या मालकाकडून नांदेड जिल्ह्यात संपूर्ण दारू मुक्ती करून दाखवावी आणि अवैध धंदे बंद करून दाखवावेत मगच इतरांवर आरोप करावेत, असा सल्लाही दिला आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy