कुंडलवाडी परिसरात वाळू माफीया जोमात ; महसूल व पोलीस प्रशासन कोमात

हुनगुंदा शिवारातील मांजरा नदीपात्रातून   बेसुमार अवैध वाळू उपसा !!

( कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे )
      नवीन वाळू धोरण लागू होईल तेंव्हा होईल पण या वर्षी तालुक्यातील कोणत्याही वाळूघाटाचा लिलाव झाला नसल्यामुळे वाळू माफीया मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असुन शहरापासून जवळच असलेल्या हुनगुंदा शिवारातील मांजरा नदीपात्रातून रात्री १० वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत बेसुमार अवैध वाळू उपसा व वाहतूक २० ते २५ ट्रँक्टरद्वारे होत असताना महसूल व पोलीस प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक ‘अर्थपूर्ण ‘ दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.वाळू माफीया जोमात,महसूल व पोलीस प्रशासन कोमात गेले आहे.
            कुंडलवाडी सह बिलोली तालुक्यातील मांजरा नदी ही लाल वाळूसाठी महाराष्ट्र, तेलगंणा,आंध्रप्रदेश व कर्नाटकात मोठी मागणी असते.पण यावर्षी शासनाच्या नवीन वाळू धोरणामुळे तालुक्यातील कोणत्याही वाळू घाटाचा लिलाव झाला नाही.त्यामुळे महसूल व पोलीस यंत्रणेला हाताशी धरून हुनगुंदा शिवारात वाळू माफीया अवैध वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणात करीत आहेत.यावर कारवाई करण्याऐवजी महसुलचेच अधिकारी व कर्मचारी हे ट्रक्टँर,टिप्पर द्वारे वाळू माफीयांशी हातमिळवणी करून या गोरखधंद्यात उतरले असल्याची चर्चा होत आहे.याप्रकारामुळे रक्षकच समजले जाणारे महसूल चे अधिकारी, कर्मचारी भक्षक झाले असल्याने दाद मागावी तर कुणाकडे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
              गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मांजरा नदीपात्रात वाळू वाहून आली असल्याने तसेच वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने वाळू माफीयांना जणू पर्वणीच लाभली आहे.हुनगुंदा शिवारातील मांजरा नदीपात्रात वाळू माफीयांनी रात्रीचा दिवस करीत जेसीबीद्वारे वाळू उपसा करीत रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत २० ते २५ ट्रँक्टरद्वारे अवैध वाहतूक होत आहे.अवैध वाळू उपसामुळे मांजरा नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत.हे खड्डे भविष्यात जीवघेणी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असताना आतापर्यंत महसूल व पोलीस प्रशासनाकडून एकही कारवाई करण्यात आली नसल्याने महसूल व पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
                     कुंडलवाडी शहर व परिसरातील राजकीय पक्षातील लोक,कार्यकर्ते तसेच गत अनेक वर्षापासून या व्यवसायात गुंतलेला वाळू माफीया सध्या सक्रीय झाल्याने हुनगुंदा शिवारातील मांजरा नदीपात्र वाळू माफीयांनी पोखरून काढले आहे. महसूल चे बैठे पथक नुसते नावालाच असून कागदोपत्री काम करीत आहे. महसूल चेच अधिकारी, कर्मचारी या अवैध वाळू उपसा व्यवसायात गुंतल्याने कारवाई कुणी करावी असा प्रश्न निर्माण होत आहे. रात्रभर पेट्रोलिंग करीत असलेल्या कुंडलवाडी पोलीसांना अवैध वाळू वाहतूक होत असताना कसे दिसत नाही की त्यांचेही याकडे जाणीवपूर्वक ‘ अर्थपूर्ण ‘ दुर्लक्ष होत आहे. असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. महसूल व पोलीस यंत्रणेवर अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्याची जबाबदारी असताना त्यांचेच वाळू माफीयांशी आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई कोण करणार ? असा सवाल नागरिकांतून होत आहे. या सर्व गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी विशेष लक्ष देऊन अवैध वाळू उपसा व वाहतूक थांबवावी व या गोरखधंद्यात वाळू माफीयांशी हातमिळवणी असणाऱ्या महसूल व पोलीस यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या