विशेष मागास प्रवर्गाच्या व विणकरांच्या विविध मागण्यांसाठी 5 मार्च 2025 पासून पुणे येथील संचालक बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलनास पाठींबा देत नायगाव तालुका पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने नायगावच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सन 1994 मध्ये इतर मागास प्रवर्गात समाविष्ट असलेल्या जातींपैकी पद्मशाली, कोष्टी, साळी, सकुळ साळी इ. जातीच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती करण्यात आली व 2 टक्के स्वतंत्र आरक्षण लागू करण्यात आले. तसेच 12 विविध सवलती जाहीर करण्यात आल्या. परंतु 30 वर्षानंतरही 2 टक्के स्वतंत्र आरक्षण लागू करण्यात आले नाही व विविध सवलतीची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे एस.बी.सी. जातीची प्रगती होऊ शकली नाही. आपल्या न्याय हक्कांसाठी आमचा समाज सन 2000 पासून दरवर्षी शांततामय मार्गाने उपोषणे व धरणे आंदोलने करून शासनासोबत चर्चा करीत आहोत. शासनातर्फे दरवेळी आम्हांस आश्वासने दिली. परंतु अजूनही 2 टक्के स्वतंत्र आरक्षण मिळाले नाही. तरी खालील मागण्या मान्य कराव्या या निवेदनात नमूद करण्यात आले
मागण्या :-
1) वैद्यकिय, अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी (एस.बी.सी.) 2 टक्के स्वतंत्र आरक्षण 2025 च्या सत्रापासून लागू करावे.
2) विणकरांचे आर्थिक विकास महामंडळावर संघटनेचे प्रतिनिधी यांची नेमणूक करुन त्वरीत चालू करावे.
3) विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात 10 आश्रमशाळा सुरु कराव्यात.
4) विशेष मागास प्रवर्गासाठी 2 टक्के राजकीय आरक्षण लागू करावे.
5) विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ द्यावे.
6) विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्यशासनाच्या योजनांसाठी एस. बी. सी. व केंद्र शासनाच्या योजनासाठी ओ.बी.सी. प्रमाणपत्र द्यावे.
7) एस.बी.सी. कर्मचाऱ्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत पदोन्नती द्यावी.
8) एस.बी.सी. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृहे सुरु करावेत.व आमच्या समाजाच्या विविध मागण्या शासनास कळवाव्यात अशा या विविध मागण्याचे निवेदन नायगावच्या तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड.यांना नायगाव तालुका पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy