बांधकाम मजुराचा मुलगा बनला नायब तहसीलदार ; एकाच घरातील दोघे भाऊ बनले अधिकारी !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथून दोन किमी अंतरावर असलेल्या मौजे हज्जापूर येथील बांधकाम मजुरी काम करणारे भीमराव तुरेराव यांचा छोटा मुलगा अक्षय तुरेराव याची राज्यसेवा परीक्षेतून नुकतीच नायब तहसीलदार म्हणून निवड झाली आहे.
बिलोली तालुक्यातील हज्जापूर येथील रहिवासी बांधकाम मजुरी करणारे भीमराव तुरेराव व अंगणवाडी सेविका भारतीबाई तुरेराव यांचा छोटा मुलगा अक्षय तुरेराव हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेतून नायब तहसीलदार झाला आहे.
अक्षयने पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा हज्जापूर, पाचवी ते आठवी जिल्हा परिषद कन्या शाळा कुंडलवाडी, आठवी ते दहावी पानसरे हायस्कूल धर्माबाद, अकरावी ते बारावी लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद, बी टेक.कोल्हापूर येथून पूर्ण केले.
बी टेकचे शिक्षण पूर्ण झाल्यावर कुठेही नोकरी न करता पुणे येथे 2019 पासून राज्यसेवेची तयारी करीत होता. विशेष म्हणजे त्याने कुठेही कोचिंग क्लासेस न लावता कोरोनाच्या काळात सेल्फ स्टडी करून हे यश संपादन केले आहे.
अक्षयचा मोठा भाऊ अजय तुरेराव ची 2018 मध्ये राज्यसेवा परीक्षेतून सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून निवड झाली होती.  आता तो यवतमाळ येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
 अजय व अक्षयच्या आईवडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरावर तुळशीपत्र ठेवून दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन दोन्ही मुलांना प्रशासकीय अधिकारी बनवल्याबद्दल त्यांच्या आईवडिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अक्षयने आपल्या यशाचे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर, आई – वडील, भाऊ यांना दिले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या