सुरेशदादा गायकवाड हे आंबेडकर चळवळीतील अग्रनि नाव – प्रकाशदादा कांबळे

दलित पँथर सारख्या वादळी संघटनेतून निर्माण झालेल आणि बिकट परिस्थितीतही निर्भीडपणे लोकांच्या प्रश्नांवर लढाऊ बाण्याने अन्याय-अत्याचारविरुद्ध लढणार हे नेतृत्व !
उमेदीची तरुणाई ढळल्या नंतरही आजपर्यंत त्याच जोमाचा ताठा, तोच प्रभावी बाणा अजून त्यांच्यात कायम दिसतो. चळवळीत काम करताना अनेक उतार – चढाव आले, अनेक अडचणीं आल्या, अनेक संकटाशी दोन हात करावे लागले, कधी यशापशांचे तोंड पहावे लागले. पण यशाने मातला नाही, कि अपयशाने खचला नाही. असा हा नेता कोणत्या रसायनांने बनला हे मात्र अजून उमगले नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक रसायनाने तयार झालेला हा नेता देशातील रंजल्या गांजल्यांचे प्रश्न घेऊन राज्यात आणि देशाच्या अनेक प्रांतात पायाला भिंगरी बांधून फिरला, कधी सत्तेचा मोह केला नाही की, लाभाच्या पदाची भीक कुणाला मागितली नाही. घराणेशाहीचा विरोध, अंधश्रद्धा आणि असत्याला कडाडून विरोध केल्याने ते आज आहेत तिथेच आहेत त्यांना शिव्या शाप देऊन सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणारे मात्रआज मजेत आहेत.
तरीही सुरेशदादा गायकवाड यांनी त्यांच्याबद्दल कधी अपशब्द काढला नाही की त्यांच्याबद्दल कधी खंत व्यक्त केली नाही. “जा तेरा भी भला हो” याच भावनेनं वागले.

सुरेशदादा गायकवाड यांनी सार्वजनिक जीवनात अनेक मित्र कमावले, तसे अनेकजन त्यांचे राजकीय शत्रूही झाले.पण शत्रू आणि मित्र यांचेशी ते कधीच कायम शत्रुत्वाच्या नात्याने वागले नाहीत, प्रश्नापुरतेच शत्रुत्व नंतर मात्र व्यक्तिगत जीवनात ते सर्वांशी मित्रत्वाच्या नात्यानेच अजूनही वागतात, हे त्यांच मोठेपण !

सुरेशदादा यांच्या सोबत अनेक वषे काम करण्याचा योग आला, तो मोठा वक्ता आहे, अभ्यासू आहे, हजरजबाबी आहे, कुणाचीही भीडभाड न ठेवता परखडपणे व्यक्त होणारा वक्ता आहे. एक प्रसंग मला आठवतो पूर्णेत नामविस्तार दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने नगरसेवक उत्तम खंदारे यांनी माझे सह सुरेशदादा गायकवाड आणि प्रा जोगेंद्र कवाडे यांना जाहीर सभेसाठी निमंत्रित केले होते, माईकवरून कवाडे सरांना नामांतराचे शिल्पकार म्हणून संबोधिले जात होते, त्यावर कवाडे ही असे संभोधण्यास मनाई करीत नव्हते, सुरेशदादानी त्यावेळी केलेला पानऊतारा कवाडे सह अनेकांच्या जिव्हारी लागला ते म्हणाले, नामांतराचा प्रश्न जेंव्हा आम्ही लढत होतो तेंव्हा क्वाडेंचा जन्मही झाला नव्हता, आम्ही मोर्चे काढीत होतो, पोलिसांचे दंडुके खात होतो, प्रसंगी जेलमधे ही जाण्याची पाळी आली, अनेकांचे संसार उद्धवस्त झाले,अनेकांच्या घरांची राखरांघोळी झाली, अनेकांना प्रांणांची आहुती द्यावी लागली, तेंव्हा कवाडे सर, प्राध्यापक म्हणून काम करीत होते, एक लॉंग मार्च काढला आणि नामांतराचे शिल्पकार ?
मराठवाड्याने अनेक यातना सहन केल्या, दुःख भोगले आणि कवाडे नामांतराचे शिल्पकार ?लोकांनी दादांच्या या परखड बोलण्याला टाळ्यांच्या गजरात मोठी साद दिली.असा हा वक्ता ! त्यांच्या वक्तव्याला तोड नाही.
सुरेशदादा गायकवाड यांच्या जीवनात अनेक उतार चढाव आले, त्यांनी त्यांचा राजकीय जीवनात अनेक प्रासंगिक तडजोडी केल्या,त्या सर्व फसल्या, पण ते निराश झाले नाहीत, त्यांनी प्रसंगानुप घातलेले कपडे तेंव्हाच काढून फेकले. ते कायमस्वरूपी कधीच आपल्यावर झुल म्हणून वापरले नाहीत, त्यांनी त्यांची निंदाही केली नाही व स्तुतीही केली नाही, या माणसात प्रचंड आत्मविश्वास पहायला मिळतो. त्यांच्या शब्दा शब्दातून स्वाभिमानाची चुणूक दिसते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारीक रसायनाने घडलेला हा माणूस बड्या बड्या सामोरं कधी झुकला नाही पण कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन लहान लेकरसारखे ओक्साबोक्सी रडलेला मी पाहिलं, जेवढा कठोर तेंव्हाडाच मृदू हृदयाचा हा माणूस असेल असा विश्वास बसत नाही. पाषाणाप्रमाणे कठोर माणूस इतका हळवा असू शकतो ? पण हे सत्य आहे.
सुरेशदादा गायकवाड यांच्यात अजूनही एक कार्यकर्ता दडलेला आहे, त्याच्यात एक नेता दडलेला आहे, पण सुरेशने कधी नेतेगिरी केली नाही, कुणाच्या सावलीत तो वाढला नाही, जे तो आज आहे ते त्याच्या स्व कतृत्त्वाचे आहे, त्याने ते अथक परिश्रमाने निर्माण केलेले आहे,कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही,की आर्थिक स्थैर्य नाही की कोणता वारसा नसतांना सुरेशदादा गायकवाड हे नावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील थोरा मोठ्यांत, पुढारी, नेते, विचारवंत, साहित्यिक, बाल आबालात चर्चिल्या जाते, त्यासाठी त्यांचे परिश्रम, त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांप्रति असलेल्या निष्ठाच कारणीभूत आहेत, असे वाटते.
अनेक अपयशांचे धक्के लागूनही हा माणूस कुठेच डगमगत नाही, निराश होत नाही, हे अनाकलनीय आहे,असो आज त्यांचा वाढदिवस आहे, तो जगणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात येतो, प्रत्येक जण दिवस आणि वर्षे मोजतात, दादांचा वाढदिवस ही शिळी शिदोरी आहे, यात अनुभव बांधले जातात, नव्या संकल्पनांचा आढावा घेऊन पुढचे संकल्प करून वाटचालीची दिशा ठरविली जाते, जगतात तर सर्वच पण लोकांसाठी जगायचे, त्यांचे दुःख आपले दुःख समजून जगणे फार अवघड, अशा जगण्याला शतशः प्रणाम!
दादांचे आतापर्यंतचे जगणे लोकांसाठीच होते, त्यांचे स्वतःचे कुटुंब फार छोटे, पण समाजाचे कुटुंब फार मोठे, ते आपल्या छोट्या कुटुंबात कमी आणि मोठ्या कुटुंबातच जास्त वेळ देतांना आजपर्यंत दिसले, समाजाचा ध्यास त्यांच्या अंगी भिनलेला आहे, त्यांच्या छोट्या आणि मोठ्या दोन्ही कुटुंबांना सुख,समृद्धी,शांती, प्राप्त होण्यासाठी त्यांना निरोगी आयुष्य,बल प्राप्त होवो, हीच त्यांना त्यांच्या वाढदिवस दिनी मंगलकामना।

-(प्रकाश दादा कांबळे यांच्या फेसबुक वाॅलवरून !)

ताज्या बातम्या