टोकीओ आँलम्पिक मध्ये धर्माबाद च्या शाळेचे विद्यार्थी चैतन्य भंडारे भारतीय संघाचे मुख्य समन्वयक !

धर्माबाद ते जपान ………चैतन्यमय प्रवास !
◆ नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट !
( धर्माबाद प्रतिनिधी – चंद्रभीम हौजेकर )
बारावी वर्गात तीन वेळा नापास होऊन ही चैतन्य भंडारे यांनी अपयश ही यशाची पायरी आहे.अपयश आल्याने खचून न जाता इच्छाशक्ती व परिश्रमाच्या जोरावर अपयशाचे रूपांतर करून यशाला गवसनी घालता येते.हे सिद्ध करून दाखवून धर्माबाद सह नांदेड चा झेंडा भारतातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडे जपानमधील टोकीओ येथे फडकविला आहे.
चैतन्य किशनराव भंडारे.सध्या जपानमध्ये चालू असलेल्या आँलम्पिक मध्ये चैतन्य हे भारताचे मुख्य समन्वयक म्हणून काम करीत आहेत.धर्माबाद येथे शिक्षण घेतलेल्या चैतन्य यांच्या या कामगिरीने धर्माबादकरांसाठी हि अभिमानाची गोष्ट आहे.
चैतन्य भंडारे यांचे मूळ गाव मुदखेड तालुक्यातील चिकाळा हे गाव असून सध्या ते जपानमध्ये वास्तव्यास आहेत.
चैतन्य यांचे वडील पोलिस दलात होते.त्यामुळे त्यांच्या बदल्या होत असत. चैतन्य जन्माला येण्यापूर्वी त्यांच्या वडिलांची बदली देगलूर तालुक्यातील मरखेल येथे झाली होती. त्यावेळी मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेबांचे नाव देण्याच्या मागणीसाठी नामांतर लढा सुरू होता. आई-वडील दलित वस्तीत राहत होते. एके दिवशी अचानक दलित वस्तीवर हल्ला झाला. सुदैवाने पोलिसांच्या गाड्या वेळेवर आल्या व पुढील अनर्थ टळला होता. त्याच रात्री चैतन्य यांचा जन्म झाला.
चैतन्य यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूल येथे झाले आहे. त्यानंतर नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत हिंदी हा विषय ऐच्छिक विषय असताना त्याच हिंदी विषयात चैतन्य नापास झाले. नापास झाल्याने चैतन्य यांनी शिक्षण सोडून घरचा टेम्पो चालवू लागले. धर्माबाद शाळेचे शिक्षक डी डी कुलकर्णी आणि आईने हा व्यवसाय सोडून पुन्हा शिकण्यास भाग पाडले त्यानंतर संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयातून बारावीनंतर विज्ञान शाखेची पदवी पहिल्या श्रेणीत मिळवली.
मात्र यानंतर एमएससी व बीएड करून प्राध्यापक होण्याऐवजी काही गुरुजनांच्या सल्ल्याने भोपाळच्या बरकतुला विद्यापीठातून दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून ‘ मास्टर ऑफ फिशरीयल सायन्स’ ही पदवी मिळवली.
प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व परेड मध्ये निवड झाली. शिवाय बासरी,गिटार हार्मोनियम यात चैतन्य यांना रस आहे. समुद्रशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जपानमधील संस्था आदर्श मानले जातात. तेथे जाण्याची जिद्द बाळगून असल्याने जपानी संस्थेची प्रवेश परीक्षा चैतन्य यांनी दिली व त्यांची निवड झाली. जपानी सरकार दरवर्षी उच्च शिक्षणासाठी (पीएचडी) शिष्यवृत्ती देते. या शिष्यवृत्तीसाठी देशातून दरवर्षी हजारो अर्ज येतात. पण या शिष्यवृत्तीसाठी फक्त तीन विद्यार्थ्यांची निवड होते. २००६ सली चैतन्य यांची निवड झाली.
२००८ मध्ये नॅशनल कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी मिळविली पण शिक्षण सुरू होते. नोकरी करीत असताना जपानमधील क्योटो विद्यापीठात डॉक्टरेट साठी नोंदणी केली व मैझरू फिशरीज रिसर्च स्टेशनमध्ये अभ्यास करून ऑक्‍टोबर २०१२ मध्ये जपानमध्ये प्रतिष्ठेची मानली जाणारी व ‘मोंबुकागाकुशो स्कॉलर’ ही उपाधी (डॉक्टरेट) मिळवली.
चैतन्य भंडारे यांचे जपानमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य असून त्यांनी २०११ मध्ये आलेल्या तोहोकु त्सुनामीतील पीडितांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबवित त्सुनामीग्रस्तांना मदत पुरवली. जपानमध्ये चैतन्य भंडारे हे दोन कंपनीचे मालक आहेत तसेच सध्या टोकियो येथे चालू असलेल्या जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पथक व ऑलम्पिक व्यवस्थापक यांच्यातील दुवा म्हणून चैतन्य भंडारे भारतीय पथकाचे मुख्य समन्वयक म्हणून काम करीत आहेत.
ही नांदेडकरांसाठी नव्हे तर भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
चैतन्य भंडारे यांनी प्रतिकूल परिस्थितीला जिद्द व परिश्रमाच्या बळावर अनुकूल करून आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले हे नवतरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या