राजकीय दबावापोटी स्नेहल कांबळे वर पोलीस कारवाई करीत नसल्याचा वंचितचा आरोप !

ठाणे, दि. २९ –

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या तरुणीला पोलीस सहकार्य करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या तरुणी विरोधात गुन्हा दाखल केला जात नसून त्या तरुणीला पोलीस संरक्षण देत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. आक्षेपार्ह लिखाण हे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही असे अंबरनाथ पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ, शिवाजीनगर पोलीस ठाण्या बाहेरच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

अंबरनाथ येथे राहणारी स्नेहल कांबळे या तरुणीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यामुळे संतापलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी निवेदन देऊन तक्रार दाखल करण्यात सांगितले होते. मात्र अंबरनाथ पोलिसांनी ठिय्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दोन दिवसांनी आपण गुन्हा दाखल करून घेऊ व तरुणीला अटक करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे दोन दिवसापूर्वी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन मागे घेतले होते. आज मात्र कायद्यात आक्षेपार्ह लिखाण हे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचे सांगत शिवाजी नगर, अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेरच आंदोलनाला सुरुवात केली आहे. अशाप्रकारे राजकीय हेतूने एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिक, खालच्या पातळीवर लिखाण करणाऱ्या लोकांना आता संरक्षण देत असून असे लिखाण कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचे पोलीस सांगत आहे. असा आरोप वंचित बहुजन महिला आघाडीच्या ठाणे अध्यक्षा माया कांबळे यांनी केला आहे. राजकीय दबावापोटी अंबरनाथ पोलीस कारवाई करत नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. संबंधित तरुणीवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. अन्यथा येत्या काही दिवसात अंबरनाथ बंद करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी तर्फे देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या