लेखनीत दम असलेला पत्रकार : प्राचार्य डॉ. वसंत बिरादार !

[ विशेष प्रतिनिधि / रियाज पठान ]
मी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून प्रथम लोहा (कंधार ) येथे रुजू झालो. तेव्हा लोहा येथे गटशिक्षण अधिकारी हे पद निर्माण झाले होते; पण पद भरलेले नव्हते. गटशिक्षण अधिकारी कार्यालय नव्हते. तालुक्याचा प्रभारी कारभार कंधारचे गटशिक्षण अधिकारी यांचाकडे होता. लोहा तालुक्याचा कारभार पाहाण्यासाठी त्यांनी तालुक्याचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय मिठ्ठूलाल चौधरी यांच्या कडे दिलेला होता. त्यांच्या मदतीला सर्जेराव टेकाळे व इतर शिक्षण विस्तार अधिकारीही होते.
माझी नेमणूक कापशी विभागासाठी झालेली होती. आधी मी माध्यमिक शिक्षक होतो. प्राथमिक शाळेत काय चालते. कसे शिकवतात रेकॉर्ड कसे ठेवतात या विषयी मी चक्क अज्ञानी होतो. मी लोहा येथे गेलो. शिवराज सोनवळे व सर्जेराव टेकाळेचा पत्ता सोबत होता. मी शिवराज याला सोबत घेवून सर्जेराव टेकाळे यांच्या घरी गेलो. त्यांना सोबत घेवून मिठ्ठूलाल चौधरी यांच्याकडे गेलो. सर्जेरावची व माझी पहिलीच भेट पण गडी भलताच चांगल्या स्वभावाचा व बोलका. त्यांनी चालता चालता मला विस्तार अधिकाऱ्याची काय काय कामं असतात हे सांगत होते. शिवराज फक्त ऐकण्याची भूमिका वठवत होता. बोलण्यात चौधरी सरांचे घर कधी आले हे कळालेच नाही.
मिठ्ठूलाल हे मनाने स्वच्छ मोकळेसक वाटले. मला मारवाडी भाषेत म्हणाले,’काही घाबरायचं नाही भिया. आम्ही आहोत, बिनधास्त काम करायचं. आपल्याकडे गटशिक्षणाधिकारी नाहीत. अधिकाऱ्याचे कार्यालय नाही भिया .तुम्ही कंधारला हजर व्हा.’
मी कंधारला हजर झालो. हळूहळू दिवस सरत गेले. ओळखी वाढत गेल्या. मिठ्ठूलाल चौधरी, सर्जेराव टेकाळे, नम्रपाल रामटेके, लता कोठेेकर यांच्या बरोबर राहून मी आनंदी होतो. सर्जेराव टेकाळे मला शाळेतील बारकावे, तालुक्यातील शिक्षक व शिक्षण या विषयी भरभरून सांगयचे. पुढे हळूहळू तालुक्यातील सर्व शिक्षक, पदाधिकारी यांच्या ओळखी वाढत गेल्या व मी शिक्षकांमध्ये एवढा रमत गेलो की… “ते माझे व मी त्यांचा” कधी झालो हे मला कळालेच नाही.
नंतर लोहा गटशिक्षण अधिकऱ्याचे पद भरले गेले. लोह्याहून स्वंतत्र कारभार सुरु झाला. पहिले गट शिक्षण अधिकारी रुजू झाले व सेवानिवृत झाले. त्या ठिकाणी दुसरे गटशिक्षण अधिकारी आले. ते स्वभावाने शांत होते. पण लवकर चिडायचे. चिडचिडेपणा जास्त होता. आम्ही विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक एक मताने कार्य करत होतो. तत्कालीन गटशिक्षण अधिकारी ही चांगले काम करत होते. शाळा सुधारण्यासाठी त्यांची धडपड चालू होती. शिक्षकही साथ देत होते.
आमच्या परीने सर्व व्यवस्थित चालू होतं; पण आपले दोष आपल्याला कुठे दिसतात? आपल्यात दोष असले तरी आपण आपलीच पाठ थोपटत असतो. स्वतःलाच शाबासकी देत असतो. शेजारी किंवा एखादी भला माणूस दोष दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर दात खातोत. त्याला शिव्याशाप देतोत.
अशीच एक घटना त्या वेळी घडली. लोहा तालुक्यातील एक पत्रकार शिक्षण विभागाच्या मागेच हात धुवून लागला. (हे आमचं मत होतं) त्या पत्रकाराला मी ओळखत नव्हतो. पण त्यांचे नाव माहित होते. त्यांचे लेख मी त्यावेळी वाचत होतो व आताही वाचतो. पत्रकार म्हणजे “माहिती, बातमी “देणारा. येवढ्याच अर्थाने मी पत्रकांरकडे पहात होतो. कोणी कोणी म्हणायचे पैसे काढण्यासाठी हे पत्रकार अशा बातम्या देत राहतात.
राज्यशास्त्रात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वाचलो होतो. हा लोह्यातील पत्रकार लोहा तालुक्यातील दररोज एका जि.प. प्राथमिक शाळेची माहिती वर्तमान पत्रात छापत असे. त्या शाळेची कळा कशी आहे? याचं वर्णन त्या बातमीत असे. ती बातमी खरी असायची. त्या शाळेच्या इमारतीच्या फोटोसह ती बातमी छापलेली असायची. शाळेची अवस्था पाहून मन अस्वस्थ व्हायचं. बातमी मी दररोज वाचत असे; पण पत्रकार ओळखीचा नाही. बातमीचं एक वैशिष्ट्य होतं, हा जो पत्रकार होता तो शाळेच्या फोटोसह तेथील दुरावस्था मांडायचा. तेथील शैक्षणिक, भौतिक परिस्थितीचा लेखा जोखा मांडायचा. पण, शिक्षकांना कधीच वाईट शब्दांत हिणवलं नाही किंवा दुःखवलं नाही.
या पत्रकाराकडे शब्दांचे अलंकार होते ; पण शब्दांचे दागिने नव्हते. अलंकाराला कोठेही डाग नसतो. पण, ज्याला डाग दिलेला असतो त्याला आपण दागिना म्हणतोत. या पत्रकाराने नेहमीच शब्द अलंकाराचा उपयोग करून चुका दाखवत असे . चुका दाखविण्यासाठी त्यांनी शब्दांचे दागिने कधीच वापरले नाहीत .
आमचे तत्कालीन गटशिक्षण अधिकारी त्यांच्या बातमी नियमित वाचायचे. त्या पत्रकाराला शिव्या हासडायचे. व सर्व विस्तार अधिकाऱ्याला बोलावून सांगायचे, “या पत्रकाराला ही माहिती कोणी पुरवितो? तो आपल्या पैकीच असला पाहिजे. आपल्या पैकीच कोणी तरी घरभेदी आहे. तुम्ही विस्तार अधिकारीच ही माहिती पुरवत असावे असे मला वाटते. त्यातल्या त्यात सर्जेराव टेकाळेचे हे काम असावे असे मला वाटते.” साहेबांचे हे बोलणे ऐकून आम्ही सर्व विस्तार अधिकारी थोडेसे बिथरलोच ! हे ऐकून थोडसे वाईटही वाटले. आम्ही सर्व विस्तार अधिकारी तहसील कार्यालय लोह्याच्या मैदानावर बसून साहेबांना शपथेवर लेखी लिहून दिलो की, तो जो कोणीही पत्रकार असेल, त्यांना आम्ही माहिती पुरवलेली नाही व पुरवणारही नाही. यात जर आम्ही दोषी आढळलो तर नियमा प्रमाणे आम्ही शिक्षेस पात्र आहोत. साहेबांनी आमच्याकडून लेखी घेतल्यानंतर ते थोडे समाधानी दिसले; पण यामुळे पत्रकाराची लेखणी काही थांबली नाही.
माझी व सर्जेरावची या गोष्टींवर चर्चा झाली. सर्जेराव यांनी मला पत्रकाराविषयी माहिती पुरविली. सुरूवातीस मला वाटलं होतं, पत्रकार हा फक्त पत्रकार असेल ! पण, ते तर वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. पीएच.डी. धारक होते. आता प्राध्यापक म्हणजे मोठा माणूस ! यांना सांगायचं कसं? या माणसाने तर शिक्षण विभागाचा पिच्छाच पुरवला होता. शिक्षण विभागाची दररोज पिसं निघत होती. गटशिक्षण अधिकारी या मुळे चलबिचल झाले होते. प्राध्यापकाला शिव्याशाप देत होते. हे महाविद्यालयात काय शिकवतात याची माहिती मला आहे असेही ते म्हणायचे. आम्ही सर्वजण त्यांना सांगत होतोत,” साहेब शाळेत आपण रंग रंगोटी करू या. शाळा थोड्याशा चकचकीत (भौतिक व शैक्षणिक दृष्ट्या) करू या. किमान शाळेचं बाह्यरूप तरी बदलू या. मग हा पत्रकार आपल्या मागे लागणार नाही.” पण, पत्रकाराविषयीचा राग साहेबांचा कमी होत नव्हता.
एकदा मला सर्जेराव टेकाळेेंनी त्या पत्रकाराला दुरुनच दाखविले होते. मला वाटायचं त्या पत्रकाराला बोलवावं, त्यांचं अभिनंदन करावं, आमच्या चुका दैनिकात छापल्या बदल अभार मानायचे व पत्रकार प्राध्यापक असल्यामुळे शाळा सुधारण्यासाठी त्यांच्या बरोबर सल्लामसलत करावी. पण, साहेब म्हणतील, तुम्ही त्यांना का भेटलात? काय गरज होती? म्हणून मी त्यांना कधी भेटलो नाही. व भेटण्याचा प्रयत्न ही केला नाही.
पण एके दिवशी मी सहज एकटाच माझा शिक्षक असलेला मित्र व्ही जी. शिंदे यांना भेटण्यासाठी संत गाडगेबाबा हायस्कूल मध्ये गेलो होतो. टेकाळे सरांनी मला दुरुन दाखविले ते पत्रकार महोदय समोरुन येत होते. मध्यम उंची, काळासावळा म्हणा किंवा गव्हाळी म्हणा असा वर्ण असलेला. त्याचे बोलके डोळे. कपाळावर एका बाजूला थोडासा उंचवटा. हसरा निर्मळ चेहरा. चेहऱ्यावर कोठे म्हणजे कोठेच कठोरता, निष्ठुरता किंवा खऊठपणा दिसत नव्हता.त्याच्या चेहऱ्यावर निखळ निर्मळ हास्य होतं. त्यांनी दोन्ही हात जोडून अगदी नम्र पणे नमस्कार केला. नमस्कार करताना माझ्या समोर ते नतमस्तक झाले.
त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला महान प्राचार्य, थोर समाजवादी विचारवंत, लेखक, राजकीय विचारवंत ना.य. डोळे सर यांची आठवण झाली. त्यांची थोडी झलक मला त्या पत्रकारात दिसून आली. मी हळूच म्हटलं,”वसंत बिरादार” ” हो सर..! ”
माझ्या पायाला हात लावत वसंत बोलले. हे पाहून मी फारच गार झालो. येवढा मोठा प्राध्यापक माणूस मला एवढा मान का देतो आहे? माझ्या समोर येवढं नम्र का होतो आहे? मी काहीही बोललो नाही. वसंत मला म्हणाले,” आदरणीय सर आपण थोडा वेळ बोलू या का?” मी भानावर येवून म्हणालो,” हो वसंत, चला बोलू या काही हरकत नाही.”
थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झडल्या. नंतर जि.प. शाळा लेखमालेवर चर्चा झाली. तो विषय प्रथम मीच काढलो. वसंत अगदी दिलखुलासपणे बोलले, “सर, ही लेखमाला लिहीण्यामागे माझी कुठलीच स्वार्थी भावना नाही किंवा कुठलाही मतलब नाही. कोणाला वैयक्तिक त्रास देण्याचा हेतू तर नाहीच नाही. शिक्षण विभागाला त्रास द्यावयाचा नाही. फक्त आणि फक्त आपल्या शाळेतील भौतिक, शैक्षणिक दर्जात सुधारणा व्हावी. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे हाच माझा हेतू आहे.”
खरचं ती लेखमाला लिहिण्यामागे वसंतचा कुठलाच वाईट हेतू नव्हता. मी वसंताला म्हणालो, “वसंत, वाईट लिहिता येतं, चुकाही दाखविता येतात, तसेच चांगलेही लिहिता येते व चुका दुरुस्तही करता येतात. चांगले म्हणणारे फारच कमी असतात. आता पर्यंत शाळेतील उणिवा दाखविलात. आता शिक्षण विभागाची थोडीफार स्तुती करा. मग बघा काही क्रांती होते का? आमची मानसिकता बदलते का?” या वर वसंत पटकन म्हणाले, “सर,सर तुम्ही एक दोन शाळा चांगल्या करा. उद्यापासून चांगल्या शाळेची लेखमाला सुरु करू या. आपण सर्व मिळून आपल्या तालुक्याच्या शैक्षणिक वातावरणात बदल घडवू या.”
या पत्रकार वसंतच्या लेखमालेमुळेच लोहा तालुक्यातील जवळपास सर्वच शाळांचं अंतररूप व बाह्यरूप बदललं. प्रत्येक शाळेत वाचन कोपरा, शैक्षणिक साहित्य, प्रयोग शाळा, वाचनालय, शाळेची रंगरंगोटी, वर्ग सजावट, वृक्षारोपण व शाळेतील सर्व रेकॉर्ड अद्यावत करण्यात आले. या सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्या तालुक्यातील सर्व शिक्षकांनी जीवापाड मेहनत केली.सर्व शिक्षक जीव तोडून कामाला लागले” एक पत्रकार काय करू शकतो हे वसंतने त्यांच्या लेखणीतून सर्व नांदेड जिल्ह्याला दाखवून दिले.
हे सर्व होवूनही तत्कालीन गटशिक्षण अधिकाऱ्यांचे मत काही वसंत विषयीचे बदलले नाही.
एकदा असंच वसंत बरोबर बोलत असताना अचानक गटशिक्षण अधिकारी साहेब तेथे आले. तेथेही साहेबांनी वसंतला बरंच काही कटू बोलले. पण, वसंत एकाही शब्दाने साहेबाला बोलावून दुखावले नाही. साहेबांचं बोलणं ऐकून मलाच राग आला होता. मीच वसंतला म्हणालो, “वसंत तुमचा पगार किती ?आमचं पगार किती?साहेबांचं पगार किती?याचा विचार करा. यापुढं लक्षात ठेवा आपल्या बरोबरीच्या माणसांशीच वादविवाद घालायला शिका. “माझं बोलणं ऐकून अगदी लहान मुलासारखं वसंतने मान डोलावत म्हणाले, “हो, सर मी यापुढे यांचाशी वाद घालणार नाही. चांगल्या गोष्टींविषयी चर्चा घडवून आणेन, असे म्हणत गटशिक्षण अधिकऱ्यासमोर हात जोडत वसंत म्हणाले,” सर झालं गेलं विसरुन जा. मी जरी प्राध्यापक असलो तरी वयाने तुमच्या समोर लहान आहे. चुकलं असेल तर मला क्षमा करा.” वसंतचं हे मोठेपण, त्यांची नम्रता, लीनता, आदरातिथ्य यातून दिसून येते. हे सर्व गुण निर्मळ झऱ्या सारखं अखंड वाहतंय असा भास होत होता. आजही वसंत नावाचा निर्मळ झरा झुळू झुळू नित्य वाहतो आहे.

हे ऐकूनही साहेबांच्या मनातील सल काही निघाली नाही. जानेवारी २००८ च्या मकर संक्रातच्या दिवशी वसंतने साहेबांना फोन केला होता. ” तीळ गुळ घ्या गोड गोड बोला” असे म्हणत होते. त्या दिवशी मी व साहेब झरीला ता.लोहा येथे होतो. वसंत साहेबांना सर्व विसरून जा गोड बोला असे म्हणत होते. पण साहेब मात्र….

एक प्राध्यापक माणूस एवढा नम्र कसा काय असू शकतो ? याचे मला तेव्हाही नवल वाटले होते व आताही नवल वाटते. पत्रकाराची लेखनी किती विधायक काम करू शकते ? हे वसंतनी त्या वेळी जिल्ह्यासह लोह्याच्या शिक्षण विभागाला दाखवून दिले होते.
प्राचार्य वसंत बिरादार हे एक प्रयोगशील शिक्षक आहेत. ते स्वतः नावीन्यपूर्ण कल्पना, विविध योजना, वेगवेगळ्या ॲक्टीव्हीटीज कॉलेज मध्ये राबवत असतात. नावीन्यपूर्ण, आद्यावत ज्ञान महाविद्यालयातील सर्व तळागळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले पाहिजे, हा त्यांचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे.
वेळ गेली, दिवस सरले, वर्ष लोटले, तरी मला वसंतचा तो नम्रपणा, निखळ निर्मळ हास्य असलेला त्यांचा चेहरा, त्यांच्या लेखनीतला ‘दम’, दमदारपणा आणखीही जसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोरून तरळतो आहे. नेहमी आठवत राहतो. वसंत असाच नेहमी बहरत राहो. नावीन्यपूर्ण त्यांच्या हातून घडो. हीच अपेक्षा. एक नम्र प्राध्यापक, एक नम्र प्राचार्य, एक विधायक पत्रकार यांना माझा सलाम !
मोतीराम रुपसिंग राठोड
सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी,
नांदेड-६ / चलभाष – ९९२२६५२४०७
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या