नळयोजना नावालाच; गडगा गावचा पाणीपुरवठा तब्बल दिड वर्षापासून बंदच !

■ ऐन दिवाळीतही डोक्यावरची घागर चुकेना.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील गडगा काय ते पाण्याच्या दोन-दोन टाक्या, काय ती पाईप लाईन, सगळ काही ओके नाहीच.. कारण गावाला पाणीच मिळत नाही.अशा गंभीर समस्येला गडगा येथील गावकरी एक-दोन महीन्यापासून नाही तर तब्बल दीड वर्षापासून तोंड देत आहेत.अशीच परिस्थिती परीसरातील मोकासदरा गावची आहे.उपरोक्त गावच्या पाणीपुरवठा योजनांवर कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली मात्र महीलांच्या डोक्यावरची घागर उतरत नाही. हे वास्तव आहे.

Dipawali

नायगाव तालुक्यातील गडगा गाव अन् गावच्या पाणीपुरवठ्याची समस्या हे जणू काही समीकरणच बनले आहे. पाणीपुरवठा योजना बंद झाली म्हणजे काय झालं….? खाजगी पाणी तर मिळतेच ना…? मागच्या काळात काय झालं? आम्हाला माहीत नाही का?अशी मुक्ताफळे उधळली जावून गंभीर पाणी प्रश्न ग्रामपंचायत व्यवस्थापन दरबारात बेदखल झाला आहे. पाच हजार लोकसंख्येच्या गडगा गावच्या पाणीपुरवठ्याच्या योजनांवर कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला परंतु नळयोजना बंद आहे. गावाला भारत निर्माण योजनेंतर्गत सन २००३ मध्ये ७५ लक्ष रुपये, राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी ४० लक्ष रूपये निधी मिळाला तो योजनेच्या कामावर खर्च करण्यात आला पण गावात अंतर्गत जलवाहिनी चूकीच्या पध्दतीने टाकण्यात आली.वाॅल्व्हची कामे तर करण्यात आलीच नाहीत. टेंभुर्णी ते गडगा अशी जलवाहिनी टाकण्यात आली परंतु सदरील जलवाहिनी अनेक ठिकाणी केवळ दीड ते दोन फुट खोलीवर टाकण्यात आल्याने ती अनेकवेळा फुटली जाते. मन्याड नदीच्या काठावर टेंभुर्णीस्थित पाणीपुरवठ्याची स्वतंत्र विहीर खोदून बांधण्यात आली. आजघडीला पाण्याने तुडुंब भरलेली आहे. त्याठिकाणाहून पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन बघणाऱ्या पंप ऑपरेटरचे वेतन गडगा ग्रामपंचायतीने दिले नसल्याने पंप ऑपरेटरनी काम करणे बंद केले आहे.पंप ऑपरेटर व ग्रा.पं. व्यवस्थापन यांच्यात सुरू असलेल्या वादात गडगेकरांना खाजगी लोकांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. वर्षाकाठी पाच ते सहा हजार रूपये केवळ सांडपाण्यावर मोजावे लागते.पिण्याचे पाण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. एक, दोन महिने नव्हे तर तब्बल दीड वर्षापासून गावची सार्वजनिक नळयोजना बंद अवस्थेत आहे.

■■■ प्रतिक्रिया —👇👇👇

बिडिओ, ग्रामसेवकांना पत्र पाठवणार.

एकदा का योजना सुरू झाली की ती ग्रामपंचायतीकडे वर्ग केली जाते.ती व्यवस्थितपणे चालविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.अनेक ठिकाणी मोठ्या योजना होतात.त्याच व्यवस्थापन योग्य प्रकारे झाले तर त्या चालतात.शासनाचा लाखो रुपयांचा निधी मिळून योजना बंद रहाणे योग्य नाही.या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल.- सरनाईक,उप अभियंता पाणीपुरवठा उपविभाग नायगाव.

ग्रामसेवक फोन उचलेनात, संदेशाला उत्तर देईनात.

यासंदर्भात गडगा ग्रा.पं.चे ग्रामसेवक यादव सुर्यवंशी यांना अनेकवेळा मोबाईलवर संपर्क साधून देखील त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे व्हाॅटस अप वर संदेश पाठवला. तो त्यांनी पाहीला पण उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही. अशा कामचूकार कर्मचाऱ्याला अभय कुणाचे? हा प्रश्न आहे.

गरीबांना जगणे मुश्किल झाले!

चौरस्त्यावरच गडगा गाव आहे पण गावच्या लोकांना पाण्यासाठी बारामाही वणवास आहे. गरीबांना वर्षाला चार ते सहा हजार रूपये द्यावे लागत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. दिवाळीच्या सणातही डोक्यावरची घागर काही बंद होईना. एवढे लाखो रूपये पाण्यावर आले पण पाण्यासाठी तरसावे लागत आहे. कोणी अधिकारी याकडे लक्ष देणार का?-सौ.सागरबाई गणेशराव भांगे, लक्ष्मीबाई संभाजी गोईनवाड, कौतिकाबाई पुंडलिक रानडे, सुलोचना पिराजी गोईनवाड गावकरी मंडळी..
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या