क्वारंटाईन सेंटर्समध्ये महिलांची सुरक्षितता धोक्यात ?

मुंबई – मिरा भाईंदरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर झालेल्या बलात्कारची घटना धक्कादायक आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.

क्वारंटाईन सेंटरमध्ये विलगीकरणाच्या नियमांमुळे एकट्या महिलांना रहावे लागत आहे. अशा वेळेस विश्वासातील जवळची माणसेही मदतीला नसतात. मिरा भाईंदरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षा पुरविण्यासाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याचे पुढे आले आहे. ही घटना गंभीर आहे.

वंचित बहुजन महिला आघाडी या घटनेचा तीव्र निषेध करते व या पीडीतेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन झाले पाहिजे अशी मागणी करत आहे. ज्या सुरक्षा एजन्सीकडे या क्वारंटाईन सेंटरची सुरक्षेची जबाबदारी आहे. त्या एजन्सीकडून ही जबाबदारी ताबडतोब काढून घ्यावी व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करावी अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडी करत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात आज शेकडो क्वारंटाईन सेंटर्स निर्माण केली आहेत. त्या ठिकाणी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसंबंधी प्रश्नचिह्न निर्माण झाले आहे. COVID 19 ची भिती मनात असतानांच हा अत्याचार खुप गंभीर आहे.
COVID 19 आटोक्यात ठेवण्यासाठी क्वारंटाईन करणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे हे मान्य करतानांच, तेथील सुरक्षा, सार्वजानिक स्वच्छता, वैद्यकीय उपचार अणि देखभाल ही शासनाची अणि समाजाची जबाबदारी आहे. त्यासाठी यंत्रणा उभारत असताना योग्य खबरदारी घेतली गेली नाही, तर नागरिक ह्या सेंटरकडे जाणे टाळण्याची ही शक्यता आहे.

वंचित बहुजन महिला आघाडी महाराष्ट्र सरकारकडे पुढील मागण्या करत आहे.

1. क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यासाठी निवडण्यात येणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती विश्वासपात्र असल्या पाहिजेत. त्यासाठी काही निकष निश्चित करून निवड करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी.

2. महिलांच्या रहिवासाची सुरक्षा व्यवस्था महिला सुरक्षा रक्षकांकडेच असली पाहिजे.

3. क्वारंटाईन सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.

– रेखा ठाकूर
(अध्यक्षा, वंचित बहुजन महिला आघाडी, महाराष्ट्र)

ताज्या बातम्या