शूर जवान गंगाधर शहापुरे या सैनिकाची प्रेरणा युवकांनी घ्यावी – मा.आ.वसंतराव चव्हाण !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]

आपल्या जीवाची कसलीच परवा न करता प्रत्येक संकटाशी सामना करून आपली देशभक्ती कार्य सेवेची 21 वर्षे सेवा बजावली म्हणूनच आम्ही समाधानतेचे जीवन जगलो तेव्हा या शूर जवान गंगाधर शहापुरे या सेवानिवृत्त सैनिकाची प्रेरणा आजच्या नवतरुण युवकांनी घ्यावी असे मत मा.आ.वसंतराव चव्हाण यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील भूमिपुत्र गंगाधर मारोतराव शहापुरे या शूरवीर जवानांनी देशाच्या विविध सीमेवर आपले कर्तव्य बजावून 21 वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्याने सदर गावातील ग्रामस्थांनी सुखरूपपणे येणाऱ्या आपल्या भूमिपुत्राचा सेवापुर्ती कार्य गौरव सोहळा आयोजित केलेल्या वेळी अध्यक्षस्थानी मा.आ. वसंतराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य पूनमताई पवार, माणिकराव लोहगावे, सूर्याजी पाटील चाडकर, रुपेश देशमुख कुंटूरकर, सत्कारमूर्ती सेवानिवृत्त सैनिक गंगाधर शहापुरे व त्यांचे आई-वडील व बंधू यासह प्रा.गो.रा. परडे, मुरहारी कुंभारगावे, कवी बालाजी पेटेकर, सरपंच जळबा वाघमारे यांची उपस्थिती होती. सेवानिवृत्त सैनिक गंगाधर शहापुरे यांची तहसील जवळील महाराणी अहिल्यादेवी होळकर चौकापासून ते नायगाव शहरातून शेळगाव छत्री इथपर्यंत भव्य अशी रॅली काढण्यात आली.
गावातील हनुमान मंदिर प्रांगणात उपस्थित मान्यवरासह संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य असा त्यांचा सन्मान करण्यात आला, प्रारंभी प्रस्ताविक अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे मारुती सालेगाये यांनी या कार्यक्रमाची एकंदरीत पार्श्वभूमी मांडली तर पूनमताई पवार, माणिकराव लोहगावे,प्रा. गो.रा. परडे,प्रा. अनिल अनेराये, आपले मत व्यक्त करून सत्कारमुर्तीचे अभिनंदन केले आहे.
आपल्या सत्कारास उत्तर देताना सेवानिवृत्त सैनिक गंगाधर शहापुरे म्हणाले की, मी तुमच्या संरक्षणासाठी देशाची 21 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालो असलो तरी यापुढे आता माझ्या जन्मभूमीची सेवा करण्याचा प्रयत्न करीन, असे सांगत माझा एवढा मोठा सन्मान पाहून मी अगदी भारावूनच गेलो आहे म्हणून ग्रामस्थांचे त्यांनी जाहीर आभार मानले.
या सेवापुर्ती कार्य गौरव सोहळ्यास संपूर्ण गावातील ग्रामस्थ महिला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालन कवी व्यंकट आणेराये यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार देविदास आणेराये यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 रॅलीमध्ये ठीकठिकाणी अनेकांनी सेवानिवृत्त सैनिक गंगाधर शहापूर यांना पुष्पहार घालून स्वागत केले तर फटाके ची आतिषबाजी व प्रचंड घोषणांनी परिसर दणाणून गेले होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या