तेलंगणा सीमेवरील बिलोली येथील जिल्हा परिषद शाळेचा अखेर अंत ?

[ विशेष बातमीपत्र – अमरनाथ कांबळे ]
तेलंगणा सीमेवरील अनेक न्यायाधीश, वकील, अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार , कर्मचारी, संशोधक, लेखक घडविणारी बिलोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल ही शाळा मृत अवस्थेत असतानाच लवकरच तिचा अंत घोषित करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण विभागाने तसे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्र आणि तेलंगाना सीमेवरील नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल ही शाळा अत्यंत नावाजलेली होती. या शाळेतून अनेक व्यक्ती घडलेले आहेत. याबाबत नांदेड जिल्ह्यात वा मराठवाड्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील माध्यमात चर्चा झाली. कोरोना काळात देश पातळीवर ज्या संशोधकाची मुलाखत प्रसारित झाली “त्या” संशोधकाने याच शाळेत शिक्षण घेतल्याचे व्यक्त केले होते. या शाळेतून घडल्याचा अभिमानाने उल्लेख करणाऱ्या कथित दिग्गज व्यक्ती यासाठी विशेष प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत. अत्यंत सामान्य व्यक्ती असलेले विद्यार्थी मात्र मरणावस्थेत असलेल्या शाळेला जिवंत ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. यात पत्रकार, माजी नगराध्यक्ष- उपाध्यक्ष आणि माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्वप्रथम “एक दिवस शाळेसाठी…” ही मोहीम राबविण्यात आली.
 सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर आणि सोशल मीडिया प्रतिनिधींनी सय्यद रियाज ही मोहीम चालवली होती. यात आजी-माजी नगराध्यक्ष, आजी-माजी आमदार, शिक्षण संचालक, शिक्षण अधिकारी, शिक्षणप्रेमी, विद्यार्थी यांचा समूह तयार करून वातावरण निर्मिती करण्यात आली होती.याचबरोबर सर्वेक्षण करून विद्यार्थी संख्या वाढवण्याचा प्रयत्न झाला होता. या शाळेची हत्या करण्यासाठी सज्ज असलेल्या खाजगी शाळेचा पाठपुरावा करून त्या शाळेची हकालपट्टी करण्यात यश मिळाले. असे असले तरी या शाळेची दयनीय अवस्था रोखता आली नाही. बिलोली येथील जिल्हा परिषद शाळा लवकरच बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे नांदेड येथील शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत बिलोली येथील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या शाळेत नियमित केवळ तीन ते चार विद्यार्थी येत असल्याचे कळाले. विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे याचबरोबर जिल्हा परिषद शाळेची इमारत जर्जर झाल्यामुळे नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि शासन येथील शाळेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकते असे सूचित केले. राष्ट्रीय पातळीवर वैज्ञानिक घडविणारी, अनेक डॉक्टर, वकील , न्यायाधीश , अधिकारी, पत्रकार, आमदार तसेच विविध पदाधिकारी कर्मचारी घडविणारी शाळा हिचा अंत शिक्षण प्रेमींना वेदनादायी आहे. या शाळेच्या उत्कर्षासाठी इमारतीपूर्वी विद्यार्थी संख्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी जबाबदारी घेणारे शिक्षण विभाग, शिक्षक महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या शाळेच्या जवळपास आता इतर खाजगी संस्था उपलब्ध नसली तरी विद्यार्थी संख्या मिळविण्यात आणि टिकविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका घेणारे प्रबळ इच्छाशक्तीचे पालक पुढे न आल्यामुळे मृतप्राय झालेल्या जिल्हा परिषद हायस्कूल चा अंत जवळपास निश्चित असल्याचे बोलले जाते. तसे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. या शाळेची विद्यार्थी संख्या पळवून बिलोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल या शाळेची हत्या करू पाहणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेला इतरत्र हलविण्यात आणि पळविण्यात यश आले. असे असले तरी या शाळेला वाचविण्यात बिलोली आणि परिसरातील जनतेला यश आले नाही. इमारत ही कालबाह्य झाल्याचे पत्र शिक्षण विभागाने काढले आहे. याचबरोबर विद्यार्थी संख्या लक्षात घेता येथील विद्यार्थी अन्य शाळेला वर्ग करण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जाते.दरम्यान या शाळेच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना या शाळेबाबत प्रचंड आस्था, आपुलकी आणि उत्कंठा असल्यामुळे ते नवसंजीवनी देऊ शकतील का ? याबाबत उलट -सुलट चर्चा सुरू आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या